🚨 शिना माढा पाणी उपसा संघर्ष समितीचा तहसील कार्यालयावर थाळी नाद आंदोलन 🚨
पाणी चोरी थांबवा, नियोजनबद्ध पाणी वाटप करा; विविध मागण्यांसाठी माढ्यात आंदोलन
*माढा प्रतिनिधी शरद भांगे*, सोनामाता पाणी उपसा संघर्ष समिती, माढा तालुका यांच्या वतीने आज गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता माढा तहसील कार्यालयासमोर “थाळी नाद आंदोलन” करण्यात येणार आहे. पाणी वितरणातील अनियमितता, पाणी चोरी, कालव्यांची दुरवस्था तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
समितीने प्रशासनाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या असून, त्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, कालव्यातून होणारी पाणी चोरी आणि गैरव्यवस्थापनामुळे शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
कालव्यातील पाणी चोरी रोखण्यासाठी पोलीस संरक्षणात पाणी सोडण्यात यावे.
कालव्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडून नियोजनबद्ध पाळी जाहीर करावी.
प्रत्येक गावाला १५ ते २० दिवसांचे वेळापत्रक निश्चित करून पाणी वितरण करावे.
सर्व सब-कालवे व पाइपलाइनची स्वच्छता आणि दुरुस्ती तातडीने करावी.
संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई करावी.
सर्व गावांना सब-कालव्यामार्फत समान व न्याय्य पाणीपुरवठा करावा.
अतिरिक्त पाणी स्थानिक तलाव, ओढे व पाझर तलावांमध्ये सोडून जलसाठा वाढवावा.
ज्या भागातील कालवे दुरुस्त नाहीत, त्या भागाला पर्यायी मार्गाने पाणीपुरवठा करावा.
माणकोर्णी नदीला कालव्याचा दर्जा देण्यात यावा.
संघर्ष समितीने इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी, पाणी वापर संस्था, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीने सांगितले आहे.
