जलजीवन मिशनचे काम प्रलंबित; स्वतंत्र पाईपलाईनसाठी ग्रामपंचायतीची मागणी, काम न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा…
मुख्य संपादक,राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल व पोर्टल
पंढरपूर तालुक्यातील मौजे तारापूर, ता. पंढरपूर येथील नाला परिसरात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम मंजूर झाले असतानाही अद्याप प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत तारापूर यांच्या वतीने संबंधित विभागाकडे निवेदन देत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दादा सपाटे गॅरेज ते इंदिरा नगर या दरम्यान सुमारे १.५ कि.मी अंतरावर स्वतंत्र ३ इंची पाईपलाईन टाकण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्री. समाधान दिलीप गाडे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसंदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठरावही करण्यात आला असून त्याची नक्कल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आली आहे.
या वस्तीमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या दीर्घकाळापासून भेडसावत असल्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वतंत्र पाईपलाईन टाकल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन नियमानुसार काम सुरू करावे, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर योजनेचे काम तात्काळ सुरू न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामपंचायत सदस्य समाधान दिलीप गाडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रशासन व जलजीवन मिशन विभाग या मागणीवर कितपत लवकर कार्यवाही करतो, याकडे तारापूर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
