वीजपुरवठा वारंवार खंडित; कालवा भरला तरी पिके पाण्याअभावी करपत — अंकोली परिसरातील शेतकरी संतप्त..
सोलापूर , प्रतिनिधी : दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
मोहोळ तालुक्यातील अंकोली,कुरुल, आणि शेजबाभूळगाव या गावांना कुरुल उपकेंद्रामधून वीजपुरवठा केला जातो. शासनाकडून राज्यात भारनियमन कमी केल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी अंकोली परिसरातील शेतीचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडण्यात आले असून कालवा अनेक ठिकाणी भरून वाहत आहे, मात्र वीजपुरवठा नसल्यामुळे ते पाणी शेतापर्यंत पोहोचवणे अशक्य होत आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपत असल्याचे हृदयद्रावक चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पिकांना नियमित पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. मात्र कुरुल उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा वारंवार ट्रिप होत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीपंप बंद पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देता येत नाही. परिणामी उसासह इतर उन्हाळी पिकांवर मोठा परिणाम होत असून पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.अंकोली,
कुरुल आणि शेजबाभूळगाव परिसरातील अनेक शेतकरी सध्या उन्हाळी पिकांसाठी पूर्णपणे उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याला पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे मोटारी सुरू ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे कालवा भरून वाहत असताना देखील शेतातील पिके मात्र पाण्याविना करपत असल्याचे विरोधाभासी चित्र या भागात दिसून येत आहे.
महावितरणकडून शेतीसाठी रात्री व दिवस आठ तास वीजपुरवठा दिला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दिवसभरात जेमतेम सात तास वीजपुरवठा सुरू असला तरी त्यामध्येही वारंवार ट्रिपिंग होत असल्याने शेतकऱ्यांना सलग तीन ते चार तासही वीज मिळत नाही. त्यामुळे मोटारी सुरू ठेवणे अशक्य होत आहे. परिणामी अनेक शेतकरी रात्रभर शेतात थांबून वीज आली की मोटार सुरू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
वीजपुरवठ्याच्या या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली असून अनेकांना रात्रभर शेतातच थांबावे लागत आहे. तरीही पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे आणखी संकट ओढवले आहे.
या गंभीर समस्येबाबत महावितरणचे अभियंता अमर कारंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एक-दोन दिवसांत समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच काही शेतकरी सिंगल फेज मोटारींचा वापर करत असल्यामुळे उपकेंद्रावर अतिरिक्त भार येत असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात वाढलेल्या वीज वापरामुळेही उपकेंद्रावर ताण वाढत असून त्यामुळे वीज वारंवार ट्रिप होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अंकोली गावातील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे अभियंता अमर कारंडे यांना घेराव घालत वारंवार होणारे ट्रिपिंग तातडीने थांबवण्याची मागणी केली. तसेच शेतीसाठी सुरळीत व स्थिर वीजपुरवठा देण्यात यावा, भारनियमन कमी करावे आणि कुरुल उपकेंद्रामधील तांत्रिक अडचणी त्वरित दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाकडून शेतीला प्राधान्य देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कालव्याला मुबलक पाणी असतानाही वीजपुरवठ्याअभावी ते शेतात पोहोचू शकत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कुरुल उपकेंद्रामधून होणारा वीजपुरवठा स्थिर करावा, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी अंकोली, कुरुल आणि शेजबाभूळगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
