🚨 शेतीच्या वादाचा रक्तरंजित शेवट! दोन पुतण्यांकडून काकाची निर्घृण हत्या; मोहोळ तालुक्यात खळबळ 🚨
भाऊजयने डोळ्यात चटणी पावडर टाकली, त्यानंतर दोन्ही पुतण्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार करत काकाचा जागीच खून; आरोपी फरार, पोलिसांची चार पथके रवाना..
✍️ अंकोली (ता. मोहोळ) | प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबात रक्तरंजित घटना घडली असून, दोन पुतण्यांनी आणि त्यांच्या आईने संगनमताने काकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृताचे नाव संजय नागनाथ शिंदे (वय ५३) असे असून, ते कामती खुर्द येथील रहिवासी होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वाटणीच्या वादातून अखेर या घटनेने अत्यंत भीषण वळण घेतले.
⚖️ अनेक वर्षांपासून शेतीच्या वाटणीवरून वाद
माहितीनुसार, मृत संजय शिंदे आणि त्यांचे मोठे बंधू सतीश नागनाथ शिंदे (वय ५६) यांच्यात शेतीच्या मालकी आणि वाटणीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. हा वाद न्यायालयातही प्रलंबित होता. यापूर्वीही दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा वाद झाले होते. सुमारे चार महिन्यांपूर्वी विहिरीतील गाळ काढण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांतील संबंध अधिकच बिघडले होते.
🔪 पूर्वनियोजित कट रचून हत्या?
सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास संजय शिंदे गावांतून पाणी घेऊन आपल्या घरी जात असताना, त्यांच्या भावजय सुरेखा सतीश शिंदे यांनी अचानक त्यांच्या डोळ्यात चटणी पावडर टाकल्याने ते खाली कोसळले.
याच संधीचा फायदा घेत रणजित सतीश शिंदे (वय २५) आणि रितेश सतीश शिंदे (वय २३) यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर, डोक्यावर आणि शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या संजय शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर तिन्ही संशयित घटनास्थळावरून फरार झाले.
🚔 पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
घटनेची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवराज जकिकोरे, अनंत दीक्षित, हवालदार रमेश वाघमारे, जाधव व अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.
🔍 आरोपींच्या शोधासाठी चार विशेष पथके
हत्या करून संशयित आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवराज जकिकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू आहे.
⚠️ गावात तणावपूर्ण वातावरण
या हत्येनंतर कामती खुर्द परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढविला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
🗣️ सामाजिक प्रश्न पुन्हा ऐरणीवर
शेती, मालमत्ता आणि वाटणीच्या वादातून राज्यात वारंवार खून, मारामाऱ्या आणि कौटुंबिक संघर्षाच्या घटना घडत आहेत. अशा वादांचे वेळेत मध्यस्थीने किंवा कायदेशीर मार्गाने निराकरण न झाल्यास त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात. या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक वाद हिंसक स्वरूप धारण करत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
