पंढरपुरात देशभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, मान्यवरांचा होणार सन्मान

पंढरपुरात रविवारी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन

देशभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, मान्यवरांचा होणार सन्मान

पंढरपूर / प्रतिनिधी

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी पंढरपूर येथील योग भवन येथे उत्साहात पार पडणार असून, या अधिवेशनासाठी देशभरातील संघटनेचे राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी, विविध राज्यांतील प्रतिनिधी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली.

पुढे बोलताना प्रक्षाळे म्हणाले की जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही भारत सरकार मान्यताप्राप्त संघटना असून सर्वसामान्य नागरिकांच्या मानवाधिकारांचे संरक्षण, न्याय मिळवून देणे, सामाजिक न्यायासाठी जनजागृती करणे तसेच गरजू, वंचित आणि पीडित नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारी संघटना म्हणून ओळखली जाते.
पंढरपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात संघटनेच्या आगामी कार्याचा आढावा, विविध राज्यांतील मानवाधिकार विषयक प्रश्नांवर चर्चा, संघटनात्मक विस्तार, नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, सामाजिक उपक्रमांचे नियोजन तसेच मानवाधिकार संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग, महिला सक्षमीकरण, युवक विकास व मानवसेवा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना संघटनेच्या वतीने विशेष पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

या अधिवेशनासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, पंढरपूरमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन होत असल्याने या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सर्व पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!