मोहोळ पोलीस ठाण्याकडून गणेश मंडळांना जाहीर आवाहन…
गणेशोत्सवासाठी ऑनलाइन परवानगी घेणे आवश्यक; विसर्जन मिरवणुकीची माहिती अर्जात नमूद करण्याचे आवाहन
अंकोली,प्रतिनिधी:- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक ..
गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन करून शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे जाहीर आवाहन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी केले आहे.
गणेश मंडळांनी श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यापूर्वी पोलीस विभागाकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक असून, यासाठी महाराष्ट्र पोलीसच्या Citizen Portal वर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज करताना मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांची संपूर्ण नावे, किमान ५ व जास्तीत जास्त १० सदस्यांचे मोबाईल क्रमांक, गणेशमूर्ती स्थापना तारीख व वेळ, मंडपाची माहिती, मंडपाची लांबी-रुंदी, मूर्तीची लांबी-रुंदी, देखाव्याची माहिती तसेच मूर्तीच्या सुरक्षा व देखभालीसाठी नियुक्त कार्यकर्ते आणि CCTV कॅमेऱ्यांची माहिती अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे.
⚠️ विसर्जन मिरवणुकीची माहिती देणे महत्त्वाचे
गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्यास ऑनलाइन अर्जामध्ये ‘होय’ असा पर्याय निवडून विसर्जनाची तारीख व वेळ स्पष्टपणे नमूद करावी. ही माहिती अर्जात नमूद न केल्यास विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीस परवानगी मिळणार नसल्याची महत्त्वाची सूचना पोलीस विभागाने दिली आहे.
आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक
ऑनलाइन अर्जासोबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील मंडळ किंवा संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, मागील वर्षी घेतलेल्या पोलीस परवानगीची प्रत, सार्वजनिक जागेत मूर्ती स्थापना असल्यास ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, तर खाजगी जागेत स्थापना असल्यास जागा मालकाचा नाहरकत दाखला तसेच तात्पुरत्या वीज जोडणीची पावती आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मंडळाने संपूर्ण माहितीची खात्री करून फॉर्म सबमिट करावा व त्याची प्रिंट काढून ठेवावी. पोलीस ठाण्याकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित गणेश मंडळाने मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून परवानगीची पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
पोलीस ठाण्याकडून मंजूर करण्यात आलेल्या वैध परवान्यावर सही, शिक्का व सूचना पत्र असल्याशिवाय परवाना ग्राह्य धरला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी केली आहे.
गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी आणि गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन मोहोळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.
🔗 ऑनलाइन परवानगीसाठी महाराष्ट्र पोलीस Citizen Portal:
गणेशोत्सव परवानगी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
