संविधान दिनानिमित्त आदिवासी कुटुंबाच्या घराच्या भिंतीवर ‘संविधान उद्देशिका कोणशिले’चे अनोखे उद्घाटन
…………………………………….
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी /अनिल बाळासाहेब पठारे
26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनाच्या औचित्याने लोणी व्यंकनाथ गावातील आदिवासी दांपत्य—छाया आणि संतोष—यांच्या घराच्या भिंतीवर भारतीय संविधानातील उद्देशिकेची कोणशिला स्थापित करण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन ॲड. संभाजी बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान दिनाचा उत्सव ‘जिलेबी वाटप’ करून आनंददायी वातावरणात साजरा झाला.
उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ॲड. बोरुडे म्हणाले, “ आदिवासी कुटुंबाने आपल्या घरावर संविधान उद्देशिका कोरून लावण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. संविधानाची फक्त पूजा न करता ते आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक घरात संविधानाचे बीज पोहोचले पाहिजे, तेव्हाच संविधानिक मूल्यांची खरी रुजवण होईल.”
सहारा सर्वांगीण विकास संस्थेद्वारे राबवलेल्या या उपक्रमामुळे संविधानिक विचारांचे संवर्धन समाजमनात पेरले जात असल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. संस्था वंचित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्त घटकांना त्यांच्या संविधानिक हक्कांसाठी लढा देत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
कार्यक्रमावेळी ऍड. महेंद्र शिंदे, संतोष जठार, लालासाहेब रणसुरे, जितेंद्र पितळे, पल्लवी सोनवणे, उज्वला मदने, रोहिणी राऊत, बाळू जाधव, सुरेश भोसले, आसाराम काळे, सुरेश काळे, पिराजी भोसले, रामसिंग भोसले, अण्णा नेटवटे, संभाजी जावळे, संतोष जावळे, दत्ता गोसावी, मंगल काळे, शरद भोसले, रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एड. महेंद्र शिंदे यांनी केले, तर आभार उज्वला मदने यांनी मानले.

हा उपक्रम आदिवासी समाजात संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि परिवर्तनाची बीजे रोवणारा ठरल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
