पंढरपूर संतभूमीचे आमदार समाधान आवताडे यांच्यासह आमदार राजू खरे यांची तालिका अध्यक्षपदी निवड
मुख्य संपादक : राम गायकवाड
सहसंपादक: दादासाहेब जगताप
पंढरपूर : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास उत्साहात प्रारंभ झाला असून, विधानसभा अध्यक्ष अॅड. नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत, शिस्तबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीत पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्यासह आमदार राजू खरे यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात असून, जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आमदार समाधान आवताडे यांना सलग तिसऱ्यांदा ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न व संयमी कार्यशैलीची दखल घेत पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तालिका अध्यक्ष पद हे अत्यंत जबाबदारीचे मानले जाते. सभागृहातील चर्चेदरम्यान अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कामकाज सुरळीत पार पाडणे, सदस्यांना नियमांनुसार बोलण्याची संधी देणे, शिस्त राखणे व चर्चेला योग्य दिशा देणे ही महत्त्वाची जबाबदारी तालिका अध्यक्षांवर असते. या दृष्टीने आमदार आवताडे यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी बजावत सभागृहात निष्पक्ष व संयमी भूमिका पार पाडली होती.
आमदार राजू खरे यांचीही या पदावर निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अधिक सक्षमपणे होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सभागृहातील विविध प्रश्नांवर सखोल अभ्यासपूर्वक मते मांडणारे व मतदारसंघातील प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी पाणीप्रश्न, शेती, औद्योगिक प्रगती, रस्ते व पायाभूत सुविधा, तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न यांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळविण्यासाठी दोन्ही आमदार प्रभावीपणे भूमिका मांडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर संतभूमीचा शिलेदार म्हणून ओळख असलेल्या आमदार समाधान आवताडे यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकीय प्रतिष्ठेत भर पडली आहे. त्याचप्रमाणे आमदार राजू खरे यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याला दुहेरी प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे.
दोन्ही आमदारांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या प्रश्नांना न्याय मिळेल व विकासाला गती मिळेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
@संविधानन्यूजRG
Sanvidhannews.com
#Vidhan bhavan
# आमदारराजूखरे
