मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा १० एप्रिलपासून;

मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा १० एप्रिलपासून; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

उपमथळा :-

भाविकांसाठी अन्नदान, पालखी छबीना व वाघ्या-मुरळी जागरण गोंधळ; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..

सोलापूर प्रतिनिधी – दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.

मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि. १० एप्रिलपासून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असून या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, भारतखंडातील दंडकारण्य हा प्रांत महापुण्यस्थळ मानला जातो. येथे देवरुषी, महर्षी, तपस्वी व मुनिजन नित्य तपश्चर्या करीत असत. त्याच काळात काशी विश्वनाथांचे क्षेत्ररक्षक द्वारपाल श्री कालभैरव यांची अत्यंत श्रद्धेने पूजा, अर्चा व ध्यानधारणा करणारी एक गोपी (गौळण) आपल्या गवळीवाड्यात राहत होती. त्या परिसराला आजही “गोपी” या नावाने ओळखले जाते. तेथील जमीन अत्यंत सुपीक असून त्या शेतास सध्या देखील “गोपी” हेच नाव प्रचलित आहे.

 

 

 

एकदा नित्य ध्यानमग्न असलेल्या त्या गोपीला गाईची धार काढण्यास सांगितले असता ती हातात भांडे घेऊन वांझ कपिला गाईकडे गेली. धार काढताना भांड्यात दूध भरलेले दिसले आणि खाली मोठा फेसाचा ढीग पडलेला होता. हा चमत्कार घरातील सर्वांनी पाहिला. भक्तीरसात तल्लीन झालेल्या गोपीला समाधी अवस्थेतून बाहेर आणण्यात आले. त्याच वेळी गाईचा एक खूर त्या फेसावर पडला आणि त्या फेसरूपी पिंडीमध्ये गोपीला श्री भैरवनाथांचे अलौकिक दर्शन झाले. ती स्वयंभू पिंड आजही गाईच्या खुराच्या खुणेसह येथे अस्तित्वात असून तिची दररोज पूजा केली जाते.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद तसेच कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि. ९ रोजी रात्री १० वाजता देवाच्या सभामंडपात वाघ्या-मुरळीचा जागरण गोंधळ होणार आहे. शुक्रवारी दि. १० रोजी पहाटे ५ वाजता देवाचा अक्षता सोहळा होईल. या दिवसाला गावकऱ्यांची अष्टमी मानली जाते. या दिवशी गावकरी आपल्या आरत्या घेऊन नाळ बसवणे तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देवास अर्पण करतात.

शनिवारी दि. ११ रोजी यात्रेकरूंची अष्टमी असून या दिवशी आलेले सर्व भाविक आपला नैवेद्य पुजारी तसेच गडशी-गोसाव्यांमार्फत देवास अर्पण करतात. रविवारी दि. १२ रोजी रात्री १० वाजता शोभेच्या दारूकामाने यात्रेची सांगता होणार आहे. तसेच यात्रा काळात दररोज रात्री ९ वाजता देवाचा पालखीसह सवाद्य छबीना काढण्यात येणार आहे.

 

 

 

यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ही यात्रा शांततेत पार पडावी यासाठी मोहोळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री भैरवनाथांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *