तारापूरच्या श्री दर्लिंग ग्रामदैवत देवस्थानासाठी बाळासाहेब चव्हाण यांची उदार मदत; तब्बल तीन कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा संकल्प
मुख्य संपादक राम गायकवाड
तारापूर (प्रतिनिधी) – तारापूर गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री दर्लिंग देवस्थानाच्या विकासासाठी उदारहस्ते मदत करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारे बाळासाहेब चव्हाण यांनी तब्बल तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या निर्णयामुळे तारापूर परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, “गावाच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री दर्लिंग ग्रामदैवत देवस्थानाच्या विकासासाठी आतापर्यंत साधारण तीन कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. पुढेही देवस्थानाच्या विकासासाठी अजून खर्च करावा लागला तर त्यासाठीही आपण तयार आहोत. देवस्थान अधिक सुंदर, भव्य आणि सुविधायुक्त व्हावे यासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्याचा आमचा संकल्प आहे.”
तारापूर गावातील नागरिकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या या देवस्थानाच्या विकासासाठी सध्या विविध कामे हाती घेण्यात येत असून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भक्तांसाठी सोयी-सुविधा, मंदिर परिसराचा विस्तार अशा अनेक उपक्रमांचा विचार सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात श्री दर्लिंग देवस्थान हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचवेळी देवस्थानाच्या आजूबाजूच्या जागेबाबतही सकारात्मक भूमिका समोर आली आहे. तारापूर गावचे माजी सरपंच प्रदीप दादा निर्मळ यांनी देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. देवस्थानासाठी जितकी जागा लागेल तितकी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितल्याने देवस्थानाच्या विस्तारीकरणाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाचा विकास होत असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि भाविकांनी बाळासाहेब चव्हाण यांच्या या उदार निर्णयाचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले.

तारापूर परिसरातील धार्मिक परंपरा जपण्यासाठी आणि ग्रामदैवताचे स्थान अधिक भव्य करण्यासाठी सुरू असलेले हे काम भविष्यात गावाच्या विकासासाठीही महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. देवस्थानाचा परिसर विकसित झाल्यास भाविकांची संख्या वाढेल आणि गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनालाही नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
