शेतात काम करताना वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

शेतात काम करताना वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आढेगाव (ता. मोहोळ) येथील घटना; परिसरात हळहळ..

सोलापूर ,प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक 

मोहोळ तालुक्यातील मौजे आढेगांव येथे शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विजय राजाराम डोंगरे (वय ३८, रा. आढेगाव, ता. मोहोळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. विजय डोंगरे हे आपल्या शेतातील वस्तीवर बांधकामासाठी आलेली वाळू खाली करण्याचे काम करीत होते. त्याच वेळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसासह वीज कडाडू लागली. दरम्यान अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते जागीच कोसळले.

घटनेपूर्वी विजय डोंगरे यांनी आपल्या चुलते दिनकर शामराव डोंगरे यांना फोन करून वाळूची गाडी आली असल्याचे सांगितले होते. तसेच ती वस्तीवरील बांधकामासाठी खाली करत असल्याची माहिती दिली होती. काही वेळानंतर दिनकर डोंगरे यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे त्यांनी जवळ राहणाऱ्या अजय डोंगरे यांना फोन करून चौकशी केली.

अजय डोंगरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता विजय डोंगरे हे शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांच्या अंगावर वीज पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 

 

या घटनेची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आढेगाव गावासह परिसरात शोककळा पसरली असून डोंगरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांनी कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

 

 

@संविधान न्यूज चैनल व पोर्टल

#धक्कादायक बातमी

#शेतकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *