शेतातील घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली
✍️ सोलापूर प्रतिनिधी – दादासाहेब जगताप
संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे तेलगाव (सिना) येथे अचानक झालेल्या वादळी पावसासह विजांच्या कडकडाटामुळे एक धक्कादायक घटना घडली. शेतकरी महादेव यशवंतराव पाटील यांच्या शेतातील घरासमोरील नारळाच्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला आणि काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे तेलगाव (सिना) येथील शेतकरी महादेव यशवंतराव पाटील यांच्या मालकीच्या शेतामध्ये घरासमोर उभ्या असलेल्या उंच नारळाच्या झाडावर वादळी वातावरणात जोरदार कडकडाटासह वीज कोसळली. वीज पडताच मोठा आवाज झाला आणि झाडाचा काही भाग जळून नुकसान झाले. झाडाच्या खोडाला तडे गेल्याने व काही फांद्या जळाल्याने झाडाचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
घटनेच्या वेळी शेतातील घरामध्ये कुटुंबातील सदस्य उपस्थित होते; मात्र वीज झाडावर कोसळल्याने घरापर्यंत तिचा परिणाम पोहोचला नाही. त्यामुळे घरातील व्यक्ती सुरक्षित राहिल्या. वीज कोसळल्यानंतर काही क्षण परिसरात धूर व जळाल्याचा वास जाणवत होता. मोठ्या आवाजामुळे शेजारील शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी यापूर्वीही वादळी पावसाच्या काळात विजांचा कडकडाट वाढत असल्याचे सांगितले. सध्या वातावरणात सतत बदल होत असून अवकाळी पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा घराचे मोठे नुकसान झाले नाही. मात्र झाडाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाने पाहणी करून आवश्यक ती मदत देण्याची मागणीही व्यक्त केली आहे.

दरम्यान, तज्ञांकडून विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज कडकडत असताना उंच झाडाखाली उभे राहणे, मोकळ्या शेतात काम करणे किंवा मोबाईल व धातूची साधने वापरणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशी सूचना देण्यात येत आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात विजांच्या धोक्याची जाणीव झाली असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात सतर्कता बाळगणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला आहे.
