भैरवनाथ विद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
अंकोली, प्रतिनिधी : दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी या शाळेतील तब्बल १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता आठवीतील ७० विद्यार्थी पात्र झाले होते. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांनी अंतिम यश मिळवत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे पुढील चार वर्षांमध्ये एकूण ४८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्व १३ विद्यार्थ्यांना मिळून एकूण ६ लाख २४ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी प्रशांत मोहिते, सानिका सोमनाथ बनसोडे, तन्वी शिवराज पाटील, श्रेया आनंद पवार, श्रेयश संतोष गोडसे, विराज विठ्ठल खंदारे, विराज संजय शिंदे, अंजली सुभाष माने, सोहम सज्जन भालेराव, प्रगती अनिल अडसूळ, आर्या संतोष शिंदे, आर्यन रघुनाथ पुदे आणि सुरज संगमेश्वर पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. विभाग प्रमुख सुपेकर एस.पी. व पाटील एस.व्ही. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव के.के., पर्यवेक्षक पवार, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन बाबासाहेब क्षिरसागर तसेच सदस्य सज्जन पवार, संग्रामसिंह पवार, विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.
विद्यालयातील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती करत असल्याचे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
