प्रशांत परिचारकांना उमेदवारी नाकारल्याने सोलापूरमध्ये भाजपविरोधी नाराजी;

“प्रशांत परिचारकांना उमेदवारी नाकारल्याने सोलापूरमध्ये भाजपविरोधी नाराजी; गावागावातून हळहळ व्यक्त”

सोलापूर (प्रतिनिधी) :

पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपकडून उमेदवारी न देण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भाजपविरोधी नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत याबाबत नाराजी व्यक्त होत असून, “परिचारकांना न्याय मिळाला नाही,” अशी भावना लोकांमध्ये व्यक्त होत आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले होते. विशेषतः पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला होता. त्या वेळी परिचारक यांनी जनतेसमोर आवाहन करत भाजपला साथ देण्याची विनंती केली होती. त्याचा परिणाम म्हणून समाधान आवताडे यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आजही केली जाते.

अशा परिस्थितीत विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांसह अनेक कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावखेड्यांमध्ये याबाबत हळहळ व्यक्त होत असून, परिचारक यांचे कार्य आणि योगदान लक्षात घेऊन पक्षाने निर्णय घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया अनेक ठिकाणी ऐकू येत आहे.

 

 

 

राजकीय जाणकारांच्या मते, परिचारक हे सोलापूर जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो. दुसरीकडे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक जवळ येत असताना सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत या नाराजीचे राजकीय परिणाम काय होतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!