🩸 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अंकोली येथे भव्य रक्तदान शिबिर 🩸
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” संदेशातून मानवतेचा जागर
✍️अंकोली ,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप. 🦯 संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील
धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंकोली येथे समाजोपयोगी उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या संभाजी महाराजांना अभिवादन करत मानवतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संकल्पनेतून नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.
मंगळवार दिनांक १२ मे २०२६ रोजी अंकोली येथील मारुती मंदिर परिसरात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील युवक, शेतकरी, व्यापारी, महिला वर्ग व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटना अंकोली यांच्या वतीने करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडणार आहे. ग्रामीण भागामध्ये अनेकदा अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण, गर्भवती महिला तसेच शस्त्रक्रियेसाठी रक्ताची तातडीची आवश्यकता भासते. अशा वेळी रक्तदान हे अनेकांसाठी जीवनदान ठरते.
“एक थेंब रक्ताचा, जीवदान देऊ शकतो अमूल्य भेट” हा संदेश देत नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित केले जात आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचे जीवन त्याग, बलिदान आणि समाजसेवेचे प्रेरणास्थान असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताचे कार्य करणे हीच खरी आदरांजली असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार आहे. युवकांनी पुढाकार घेत समाजासाठी योगदान द्यावे तसेच रक्तदान चळवळ अधिक व्यापक करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अंकोली गाव पुन्हा एकदा सामाजिक कार्यात अग्रेसर ठरत असून धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“रक्तदान करा… जीवन वाचवा…!”
“आपले रक्तदान कुणासाठीही ठरू शकते जीवनाचा आधार…!”
