💥अंकोली गावावर शोककळा🌹
🌿 माजी सरपंच तथा सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व 🌿
💐 गोरख (नाना) पवार यांचे दुःखद निधन 💐
🙏 गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता 🙏
🕯️ अंकोली स्मशानभूमी येथे हस्ती लोटण्याचा कार्यक्रम 🕯️
━━━━━━━━━━━━━━━
📍 अंकोली | प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप✍️ संविधान न्यूज चॅनल व पोर्टल — सहसंपादक
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली गावचे माजी सरपंच, ज्येष्ठ समाजसेवक, सहकारी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व तसेच शेतकरी व कर्मचारी वर्गाचे हितचिंतक म्हणून परिचित असलेले गोरख (नाना) पवार यांच्या दुःखद निधनाने अंकोली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, सहकारी व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
गोरख (नाना )पवार यांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे काम करत समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी भिमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर येथे अकाउंट विभागामध्ये क्लार्क म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. त्याचबरोबर लोकनेते बाबूराव आण्णा पाटील सहकारी साखर कारखाना येथे फायनान्स मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळत आपल्या कार्यकुशलतेची वेगळी छाप पाडली होती.
कारखान्यात काम करीत असताना त्यांनी शेतकरी सभासद, बिगर सभासद, ऊसतोड टोळी मुक्काम, वाहन मालक तसेच कर्मचारी वर्ग यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहपूर्ण संबंध निर्माण केले होते. कोणत्याही व्यक्तीशी खेळीमेळीच्या वातावरणात, हसतमुखाने व प्रेमाने संवाद साधणे ही त्यांची खास ओळख होती. त्यांच्या साध्या, मनमिळावू आणि आपुलकीच्या स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून गेले.
याशिवाय त्यांनी अंकोली ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. गावाच्या विकासासाठी त्यांनी रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, सामाजिक सलोखा तसेच ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला. गावाच्या प्रगतीसाठी घेतलेले निर्णय आणि लोकहिताची भूमिका यामुळे त्यांना ग्रामस्थांचा मोठा सन्मान मिळाला होता.
🌸 त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ, तीन बहिणी तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण अंकोली गाव त्यांच्या दुःखात सहभागी झाला आहे.
🕯️ दिवंगत गोरख (नाना) पवार यांचा हस्ती लोटण्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक:- 14/05/2026 रोजी सकाळी 7 वाजता अंकोली मशानभूमी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, सहकारी क्षेत्रातील मान्यवर, कर्मचारी वर्ग तसेच सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
💐 “माणूस आपल्या कार्यातून आणि स्वभावातून कायम लोकांच्या मनात जिवंत राहतो.”
गोरख (नाना) पवार यांनी आपल्या प्रामाणिक कार्याने, प्रेमळ स्वभावाने आणि समाजसेवेने अंकोली गावाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
🙏 ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व पवार परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण प्रार्थना. 🙏
