🛑📢 आशा सेविकांच्या मानधनासाठी १ जून रोजी “चलो मुंबई” राज्यव्यापी आंदोलन 📢🛑
✍️ मुख्य संपादक – राम गायकवाड, संविधान न्यूज चॅनल व पोर्टल
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आज गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. कोरोना काळापासून ते विविध आरोग्य मोहिमांमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांना आजही नियमित व वेळेवर मानधन मिळत नसल्याची संतप्त भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.
“बिन पगार आणि फुल अधिकार” अशा परिस्थितीत आशा सेविकांना काम करावे लागत असल्याची खंत अनेक सेविकांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जात असल्या तरी गेल्या तब्बल सात महिन्यांपासून केंद्र शासनाचे मानधन थकले असल्याने अनेक आशा वर्कर्स आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च यांचा मोठा ताण या सेविकांवर निर्माण झाला आहे.
🏥 गावागावात जाऊन गर्भवती माता तपासणी, लसीकरण, कुपोषण प्रतिबंध, जनजागृती, आरोग्य सर्वेक्षण, साथीच्या रोगांवर नियंत्रण, नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवून देणे यासारखी महत्त्वाची कामे आशा सेविका सातत्याने पार पाडत आहेत. आरोग्य विभागाचा पाया मजबूत ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र त्यांच्या प्रश्नांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे.
📢 या पार्श्वभूमीवर आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनांच्या वतीने येत्या १ जून रोजी “चलो मुंबई” राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे, नियमित वेतन लागू करावे, सामाजिक सुरक्षा व शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात आले.
👩⚕️ राज्यातील हजारो आशा सेविका मुंबईत एकत्र येऊन शासनाचे लक्ष वेधणार असून, त्यांच्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी होत आहे. आरोग्य सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या या महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांतूनही व्यक्त होत आहे.
⚖️ “आरोग्याचा कणा असलेल्या आशा सेविकांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली असून, येणारे आंदोलन राज्य सरकारसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
