बियाणे घेताना सावध रहा; तणनाशक औषधांच्या दरवाढीने शेतकरी चिंतेत,

💥 बियाणे घेताना सावध रहा; तणनाशक औषधांच्या दरवाढीने शेतकरी चिंतेत…!

🖋️ अंकोली {मोहोळ}प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप ,संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक,

सध्या पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू झाली असून जिल्ह्यातील शेतकरी बियाणे, खते आणि तणनाशक औषधांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. मात्र यंदा बियाण्यांसोबतच तणनाशक औषधांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बियाणे घेताना पावती, टॅग आणि रिकामी पिशवी जपून ठेवावी, जेणेकरून भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास तक्रार करता येईल, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बाजारातील अनेक दुकानदार “कंपन्यांकडूनच तणनाशक औषधांच्या किंमती वाढून आल्या आहेत” असे सांगत आहेत. त्यामुळे सोयाबीन, मका, कापूस व इतर पिकांसाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही ठिकाणी तर गेल्या वर्षीपेक्षा तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

शेतकरी वर्गामध्ये सध्या पेरणीपूर्व तयारी सुरू असून, चांगला पाऊस झाल्यास पेरणीची लगबग आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत निकृष्ट बियाणे किंवा बनावट औषधांमुळे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभाग सतर्क झाला आहे.

🌱 कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला :

▪️ विश्वासार्ह व अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे.

▪️ खरेदीची पावती, टॅग व पिशवी जपून ठेवावी.

▪️ बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी.

▪️ तणनाशक औषधांची मुदत व कंपनीची माहिती पाहूनच खरेदी करावी.

▪️ फसवणूक झाल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा.

कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना बियाणे, खते आणि तणनाशकांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाने कृषी निविष्ठांच्या दरांवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!