सिना नदीत तात्काळ पाणी सोडा; ऊस, फळबागा आणि शेतकरी वाचवा – माढा मतदारसंघातून शासनाला आर्त साद!
मुख्य संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
माढा प्रतिनिधी ,शरद भांगे माढा लोकसभा मतदारसंघ तसेच माढा विधानसभा मतदारसंघातील सिना नदीचे पात्र सध्या पूर्णपणे कोरडे पडले असून, नदीत पाणी नसल्याने संपूर्ण परिसरात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी कोरडी पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नदीकाठच्या विंधन विहिरींची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
सिना नदीवर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. या पाण्याच्या आधारे ऊस, डाळिंब, लिंबू, द्राक्ष तसेच इतर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. मात्र नदीत पाणीच उपलब्ध नसल्याने ऊस आणि फळबागा करपू लागल्या असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या भागातील नागरिकांमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की, या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचे असल्यामुळे सिना नदीत पाणी सोडण्याबाबत अपेक्षित गतीने निर्णय होत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मात्र या संदर्भात कोणतेही अधिकृत कारण प्रशासनाने जाहीर केलेले नाही.
शेतकरी व नागरिकांनी शासनाला आवाहन केले आहे की, राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या अडचणींकडे मानवी दृष्टीकोनातून पाहावे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने संबंधित प्रशासनाला सिना नदीत पाणी सोडण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांचे उभे पीक वाचवावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
तसेच सिना–माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा करून माढा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याचबरोबर परिसरातील तलाव, बंधारे तसेच मनकर्णा नदीवरील बंधारे भरून भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे उभे पीक, जनावरांचे पिण्याचे पाणी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा या तिन्ही बाबींचा विचार करून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
