🛑 *प्रियंका गांधी व खासदार प्रणिती शिंदे यांचा संसद भवन समोर सवाल; विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा आदेश कोणी दिला?*
नवी दिल्ली : ३० जुलै २०२६
२० जुलै रोजी जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस बळाच्या वापर प्रकरणी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनाच्या मकरद्वारासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी खासदारांनी हातात पोलिस कारवाईचा “आदेश किसने दिया?” तसेच “Who Gave the Order?” असे लिहिलेले फलक घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देण्याची मागणी केली.
२० जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमार, अश्रुधुराचा वापर, पॅलेटगन व गोळीबारासह पोलिस बळाच्या कारवाईचे आदेश नेमके कोणी दिले, असा थेट सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
निदर्शनादरम्यान लाठी-गोली की सरकार नहीं चलेगी, राहुलजी गांधी को सदन में बोलने दो, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा सदन में आओ तसेच सदन में आकर जवाब दो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आंदोलन दडपण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. या कारवाईबाबत सरकारने संसदेत स्पष्ट भूमिका मांडावी, कारवाईचे आदेश देणाऱ्या व्यक्तीची माहिती जाहीर करावी आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खासदार प्रियंका गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने उत्तरदायी भूमिका घ्यावी, अशी मागणी करत “सवाल सिर्फ एक है—आखिर आदेश किसने दिया?” असा सवाल संसद परिसरात लावून धरला.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
