सोलापूर प्रतिनिधी:महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी अवैध देशी-विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात मोठी मोहीम राबवली. या धडक कारवाईत एकूण १४३ गुन्हे नोंद करून १२६ जणांवर कारवाई करण्यात आली असून २८ वाहनांसह तब्बल ९० लाख ९७ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, (अं. व द.) मुंबईचे प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव व प्रभारी उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान सोलापूर विभागात ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत ७३,४९५ लिटर गुळमिश्रित रसायन, ६,५१५ लिटर हातभट्टी दारू, १५२.३७ बॉटल विदेशी मद्य, ३१४.८२ बॉटल देशी मद्य, ३१.२ बॉटल बिअर, ४८७ लिटर ताडी, ७५० किलो काळा गूळ, तसेच ९०.५४ बॉटल परराज्यातील विदेशी मद्य जप्त करण्यात आले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांमध्ये १५ टक्के, तर मुद्देमालाच्या जप्तीत तब्बल २३२ टक्क्यांची वाढ झाल्याचे विभागाने सांगितले.
निरीक्षक आर. एम. चवरे, ओ. व्ही. घाटगे, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे, आर. एम. कोलते, तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी आणि महिला जवानांच्या सहभागातून ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.
