राष्ट्रवादीवर नाराज माजी आमदार यशवंत {तात्या} माने यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित,

सोलापूर,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप, सहसंपादक, संविधान न्यूज चॅनल:मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत {तात्या }माने बुधवारी (दि. 29) मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून, या निर्णयामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला मोठे उधाण आले होते आणि आता त्या चर्चेला अधिकृत पुष्टी मिळाली आहे.

 

यशवंत {तात्या}माने हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी आहेत. 2013 ते 2016 दरम्यान त्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. 2016 मध्ये त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळवली आणि 2016 ते 2021 दरम्यान उपाध्यक्ष, तर 2021 पासून संचालक पदावर कार्यरत आहेत.

 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी तब्बल 22 हजारांहून अधिक मतांनी उल्लेखनीय विजय मिळवून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर त्यांनी अजित पवार गटाची साथ धरली होती. 2024 मध्ये पुन्हा उमेदवारी मिळूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

 

पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडीमुळे आणि वाढत्या नाराजीमुळे त्यांनी अखेर पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे मत आहे. अजित पवार यांनी मागील पाच वर्षांत त्यांच्या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून दिला असल्याचे माने यांनी मान्य केले. तथापि, भविष्यातील राजकीय स्थैर्याच्या दृष्टीने त्यांनी भाजपची निवड केल्याचे समजते.

 

माने यांच्या प्रवेशामुळे मोहोळ आणि इंदापूर तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर भाजपची पकड अधिक सक्षम होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *