सोलापूर,प्रतिनिधी: दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल, सहसंपादक,मोहोळ तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने जनता प्रतिष्ठान तर्फे भव्य “आदर्श शिक्षक पुरस्कार” व “जीवनगौरव सन्मान सोहळा” नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात अंकोली गावाचे कर्तृत्ववान सुपुत्र आणि इनोव्हेटिव्ह स्कूल, अंकोली येथे सेवेत असलेले शिक्षक रियाज तांबोळी यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
रियाज तांबोळी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची व मूल्याधिष्ठित शिक्षणाची जपणूक करण्यासाठी दाखविलेली निष्ठा, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीची प्रशंसनीय दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार असलेल्या शिक्षकांच्या अविरत सेवेस आदरांजली वाहण्याचा हा खरा गौरवक्षण असल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच चारित्र्य, शिस्त व सामाजिक जाण निर्माण करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणारे रियाज तांबोळी हे तरुण शिक्षक पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. त्यांच्या सन्मानामुळे अंकोली ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष मा.आ. आण्णा बनसोडे साहेब, आमदार राजू खरे साहेब, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, नगरसेवक आनंद चंदनशिवे, DK बॉस तसेच प्रथितयश मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळेच सुशिक्षित, संस्कारी आणि जबाबदार समाजाची निर्मिती घडते. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा समाजाची कृतज्ञतेची भावना असल्याचे प्रतिपादन या वेळी करण्यात आले.
अंकोली गावाचा शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी रियाज तांबोळी यांचे योगदान अशीच प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत करो, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
