मोहोळ नगराध्यक्षपदासाठी सौ. आरती राजरत्न क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर
प्रतिनिधी,मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिला आरक्षणातून विविध उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, त्यापैकी सौ. आरती राजरत्न क्षीरसागर या “महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष” पुरस्कृत “अपक्ष उमेदवारानेही” आपली उमेदवारी जाहीर केली आहे. सुशिक्षित, स्थानिक आणि सामाजिक भान असलेल्या उमेदवारांमध्ये त्यांचे नाव विशेषत्वाने पुढे येत असल्याची प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होत आहे.
शैक्षणिक व वैयक्तिक पार्श्वभूमी
सौ. आरती क्षीरसागर या B.Com. पदवीधर असून, त्यांचा जन्म पुणे येथे झाला. तिथेच त्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याचीही सुरुवात केली. सध्या त्या मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील 433, भारती मोहन बंगला येथे वास्तव्यास आहेत.
कौटुंबिक व राजकीय परंपरा
सौ. आरती क्षीरसागर यांची राजकीय मुळं मजबूत असून त्या स्वतः महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर जिल्हाच्या महिला आघाडी उपाध्यक्षा असून त्या प्रख्यात रिपब्लिकन नेते, भुमिगत स्वातंत्र्यसैनिक मधुकर कृष्णाजी क्षीरसागर (पुढारी) यांच्या नातसून आहेत. त्यांच्या कुटुंबात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या अनेक व्यक्तींचा सहभाग आहे.
त्यांचे पती उच्चशिक्षित असून कायद्याचे अभ्यासक आहेत. तसेच ते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मोहोळ शहराध्यक्ष व विविध समित्यांचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. घराण्यातील ही सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी आरती क्षीरसागर यांच्या उमेदवारीला भक्कम पायाभूत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
उमेदवाराची वैशिष्ट्ये व मांडणी
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आरती क्षीरसागर यांनी स्वतःची ओळख स्वतंत्र विचारांची, स्थानिक प्रश्नांची जाण असलेली आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवणारी उमेदवार अशी करून दिली आहे. त्यांच्या मते शहरातील पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, रस्ते, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर अधिक काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे.
त्या नियमितपणे नगरपरिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यवाहीवर नजर ठेवण्याची तयारी व्यक्त करतात. शहराच्या सर्वांगीण प्रगतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्या महिलांच्या सक्षमीकरणावर व सामाजिक न्यायाच्या विचारसरणीवर भर देतात.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास आदी महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होत काम करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. माता रमाई, जिजाऊ, सावित्रीबाई व अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्या सांगतात.
मतदारांमध्ये उत्सुकता
मोहोळ नगराध्यक्षपदासाठी विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक प्रश्नांची समज व सामाजिक कार्याचा अनुभव यामुळे सौ. आरती क्षीरसागर या लढतीतील एक महत्त्वाची उमेदवार ठरू शकतात, असे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे.
