सोलापूर क्राईम ब्रांचची मोठी कामगिरी; आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद – 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी बालाजी शिंदे,विजापूर रोड परिसरातील एका रात्रीतील तीन घरफोडीच्या प्रकरणाचा वेगाने तपास करून सोलापूर शहर गुन्हे शाखेने कर्नाटकातील दोन सराईत आंतरराज्यीय चोरट्यांना अटक केली असून एकूण 20,00,180 रुपयांचा सोन्या–चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
घटना कशी घडली?
मी. 21 नोव्हेंबर 2025 रोजी विजापूर रोड परिसरात तीन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या तक्रारी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.
फिर्यादी सतिश सोलापूरे यांच्या घरातून 4.87 लाखांचे सोन्याचे दागिने चोरले गेले.
एल. श्रवणकुमार यांच्या घरातून 19.33 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले.
सौ. पूजा जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला होता.
एका रात्रीत सलग तीन घरफोडी झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गुन्हे शाखेला तपासासाठी सूचना दिल्या.
तपासातील महत्त्वाचे सूत्र
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर यांच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री झाली.
गोपनीय माहिती आणि सापळा
तपासादरम्यान पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरी करणारे दोघे गुन्हेगार दागिने विक्रीसाठी ए.जी. पाटील कॉलेजजवळील समर्थ सोसायटी परिसरात येणार आहेत.
पथकाने तत्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
अटक झालेले आरोपी
1. राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज शंभू नाईक (वय 32), रा. होन्नावार, कारवार (कर्नाटक)
2. लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक (वय 28), रा. बेळगाव (कर्नाटक)
झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून घरफोडीतील 13.3 तोळे सोने आणि 1 किलो 804 ग्रॅम चांदी असा एकूण 20 लाख 18 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत झाला.
कबुलीजबाब
चौकशीदरम्यान आरोपींनी सैफुल परिसरातील तीन घरे फोडल्याची कबुली दिली.
विजापूर येथे दागिने विक्री न जमल्याने सोलापुरात ग्राहक शोधत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यशस्वी कारवाईचे मार्गदर्शक अधिकारी
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार,
उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील,
सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पथकात सपोनि शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, इब्राहिम शेख, चालक बाळासाहेब काळे, घोरपडे, तसेच सायबर सेलमधील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, रतिकांत राजमाने यांचा समावेश होता.
—
