हिंदू–मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण ,पंढरपूर तालुक्यातील तारापूरगाव,

तारापूरवासीयांनी जपला ऐक्याचा सलोखा

हिंदू–मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण… मुख्य संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल 

 

सध्याच्या सामाजिक वातावरणात जात-धर्माच्या नावाने मतभेद वाढताना दिसत असताना, पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील ग्रामस्थांनी सलोखा, ऐक्य आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

 

तारापूर गावातील ज्येष्ठ नागरिक मोतीलाल बाबूलाल तांबोळी — जे मुस्लिम बांधव असून पान विक्री व बांगड्या भरण्याचा छोटा व्यवसाय करतात — यांनी आपल्या थोरल्या मुलगा इलाई बाबूलाल तांबोळी यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत श्री दर्लिंग देवस्थान येथे प्रसादासाठी लागणारी सुमारे एक लाख रुपयांची भांडी निस्वार्थ भावनेने दान केली आहेत.

 

या प्रसंगी मंदिराचे पुजारी दादा पुजारी, मा. तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर सपाटे, वालगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सपाटे, ग्रा.पं. सदस्य गोरख वाघमोडे, शशिकांत क्षीरसागर, संजय शिंदे (मेजर) आदी मान्यवर उपस्थित होते. वालगी मंडळाच्यावतीने मोतीलाल तांबोळी यांचा सन्मान करण्यात आला.

 

हिंदू मंदिरासाठी मुस्लिम बांधवाकडून एवढे मोठे व निस्वार्थ दान दिल्याने ग्रामस्थांतून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. “धर्म वेगळा असला तरी माणुसकीच सर्वात मोठा धर्म” याची जाणीव या घटनेतून स्पष्टपणे दिसून येते.

 

तारापूर गावात हिंदू–मुस्लिम बांधव अनेक उपक्रमांमधून एकोप्याने सहभागी होत एकतेचा संदेश जपत आहेत. आजच्या काळात समाजाला दिशा देणारे हे प्रेरणादायी उदाहरण निश्चितच अनुकरणीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *