चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; आरोपीचा सिनेस्टाइल पाठलागानंतर अटक
वालचंदनगर / शेळगाव (ता. इंदापूर) : प्रतिनिधी विठ्ठल काळे
शेळगाव (ता. इंदापूर) येथे चारित्र्याच्या संशय घेऊन पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा मल्हारी खोमणे (वय 35, रा. शेळगाव, ता. इंदापूर) ही सकाळी घरात आंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करत असताना, तिचा पती मल्हारी रोहिदास खोमणे याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला.
वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपीने चुलीमध्ये जळत असलेल्या लाकडी दांडक्याने मनीषा हिच्या डाव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर तसेच डोक्यावर चार ते पाच वेळा जोरात प्रहार करून तिला रक्तबंबाळ केले. गंभीर जखमी अवस्थेत तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी मल्हारी खोमणे याने आपला ठावठिकाणा कोणालाही समजू नये म्हणून स्वतःचा मोबाईल घरातच ठेवून त्याच्याकडील चारचाकी वाहनातून पळ काढला. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत मनीषा खोमणे यांना नातेवाईकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर येथे उपचारासाठी नेले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी मयत महिलेच्या नातेवाईकांकडून व घटनास्थळी जमलेल्या नागरिकांकडून सविस्तर माहिती घेतली.
याप्रकरणी मयत महिलेची आई बबई भीमराव मदने (वय 60, रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 417/2025 अन्वये बी.एन.एस. कलम 103(1), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक (पुणे विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीचा शोध
घेण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनकडील तपास पथक व पोलीस अंमलदारांची स्वतंत्र अशी तीन पथके तयार करून रवाना करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेजुरी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपी त्याच्याकडील चारचाकी वाहनातून वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र
वालचंदनगर पोलिसांनी शिताफीने वाहनातून पाठलाग करून आरोपीस ताब्यात घेतले.
दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 07:45 वाजता आरोपी मल्हारी खोमणे यास अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास 29 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजकुमार डुणगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे करीत आहेत.
