लोणी व्यंकनाथ येथे तालुकास्तरीय आरोग्य जनसंवादातून आरोग्य योजनांतील गंभीर त्रुटी उघड; 149 गरोदर महिलांच्या अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर
………………………………………..
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी /श्री अनिल बाळासाहेब पठारे
इकोनेट, पुणे संस्थेच्या वतीने लोणी व्यंकनाथ येथे दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी तालुकास्तरीय आरोग्याचा जनसंवाद कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. वंचित व दुर्बल घटकांच्या सन्मानार्थ समई प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन पंचायत समिती श्रीगोंदा येथील श्री. रणजित अकुलवार (सहाय्यक गटविकास अधिकारी), श्री. महेश थोरात (कक्ष अधिकारी), श्री. मनोज बनकर (विस्तार अधिकारी), श्री. संदीप आल्हाट (पं.स.प.विभाग) तसेच या कार्यक्रमाचे पॅनालिस्ट वकील ॲड. महेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भोसले, दैनिक लोकमतचे पत्रकार बाळासाहेब काकडे, डॉक्टर डॉ. सचिन जाधव आणि विविध आरोग्य संस्थांतील डॉक्टर, नर्स, एनएम, एमएचव्ही, एलएसओ, डीओ, एचए व डॉ. शुभम भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या जनसंवाद कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी व्यंकनाथ, बेलवंडी बुद्रुक, काष्टी तसेच त्याअंतर्गत येणारे उपकेंद्र राजापूर, चिंभळा व लिंपणगाव उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील हक्कधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात जननी सुरक्षा योजना व मातृत्व वंदना योजना अंतर्गत एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 149 महिलांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे हा अभ्यास परालिगल कार्यकर्ता संतोष भोसले यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसमोर मांडला.
मातृत्व वंदना योजनेत 37 महिलांपैकी 20 महिलांना पहिला हप्ता तर
23 महिलांना दुसरा हप्ता मिळालेला नाही.
जननी सुरक्षा योजनेत 68 महिलांपैकी 61 महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही.
149 गरोदर महिलांपैकी केवळ 25 महिलांना सरकारी दवाखान्यातून मोफत सोनोग्राफी मिळाली, तर 124 महिलांना हा लाभ नाकारला गेला.
पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था
अभ्यासादरम्यान आरोग्य केंद्रांतील पायाभूत सुविधांची अत्यंत खराब स्थिती समोर आली.
बेलवंडी उपकेंद्रात खिडक्यांच्या काचा तुटलेल्या, डिलिव्हरी रूममधील बेसिन खराब, अस्वच्छ स्वच्छतागृह
लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तुटलेले बेसिन पाईप, अस्वच्छ स्वच्छतागृह, खाटांवर बेडशीट नसणे, झाडांच्या कुंडीत गुटखा पानाचे कागद व औषधांच्या बाटल्या
काष्टी येथे गंजलेल्या कात्री
लिंपणगाव येथे जाळ्या, जळमटे व वापरात नसलेले स्वच्छतागृह
राजापूर येथे मुदत संपलेली औषधे आढळून आली
याशिवाय डॉक्टर व एएनएम यांच्यासाठी राहण्याच्या हेडक्वार्टर्सचा अभाव, स्वच्छ स्वच्छतागृह नसणे, गळती असलेले नळ, पावसाळ्यात गळणारी छत अशा अनेक समस्या समोर आणण्यात आल्या.
ठोस निर्णय व लेखी आश्वासन
या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन सर्व उपस्थित अधिकारी, हक्कधारक व दहा गावांतील नागरिकांनी एकमताने निर्णय घेतला.
योजनांचा पाठपुरावा करून प्रलंबित लाभ तात्काळ देणे, पायाभूत सुविधा दुरुस्त करणे, रिक्त पदे भरणे व औषध साठा वाढवणे या सर्व बाबी लेखी प्रस्तावाद्वारे मंजूर करण्यात आल्या.
या प्रस्तावावर सर्व उपस्थित अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले.
हा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती इकोनेट संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी इकोनेट संस्थेच्या सीईओ गौरी भोपटकर, सुनिता देशमुख, राहुल साळवी, विंदा महाजन, स्वप्नील नेवाळे, क्रांती अग्निहोत्री व जितेंद्र कठाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परालिगल कार्यकर्ता संतोष भोसले यांच्यासह सुनीता देशमुख, पवन रणदिवे, पल्लवी सोनवणे, छाया भोसले, सलमान शेख, उज्वला मदने, अशोक मोरे, रोहिणी राऊत, दत्ता गोसावी व संतोष जठार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला संदीप कांबळे, चंद्रकांत थोरात, डॉ.काकडे,सुभाष शिंदे, सोनवणे साहेब, संभाजी जावळे, रवींद्र चव्हाण, कौसर पठाण, वनिता काळे, भाग्यश्री दळवी, प्रमिला काकडे, छाया खलाटे, कविता चव्हाण, मंदा जावळे, सुवर्णा गोरखे, मंगल काळे, अनिता भोसले, प्रशांत पवार, करण चव्हाण, राहुल काळे, दर्शना माळी, तृप्ती जाधव, उषा वाखारे, दत्तात्रय मदने, रवींद्र अडागळे, काजोरी पवार, मीराताई राठोड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला मदने यांनी केले, सूत्रसंचालन छाया भोसले यांनी तर आभार प्रदर्शन संतोष जठार यांनी केले. अशी माहिती पॅरालीगल कार्यकर्ता संतोष भोसले यांनी दिली
