भिगवन येथे युवा उद्योजक अक्षय हरी भुई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; तब्बल ५०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
तारापूर / प्रतिनिधी : मुख्य संपादक राम गायकवाड
पंढरपूर तालुक्यातील तारापूर गावचे सुपुत्र व भिगवन परिसरातील यशस्वी युवा उद्योजक मा. अक्षय हरी भुई यांच्या वाढदिवसानिमित्त आज भिगवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात तब्बल सुमारे ५०० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. तारापूरसह परिसरातील अनेक युवक, शेतकरी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भिगवन येथे जाऊन रक्तदान केले. वाढदिवस साजरा करण्याचा हा वेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातून प्रगतीचा प्रवास करत भिगवन येथे उद्योग क्षेत्रात आपले साम्राज्य उभे करणारे अक्षय हरी भुई हे अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. स्वतःच्या यशाचा आनंद समाजाशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न या रक्तदान शिबिरातून दिसून आला.
यावेळी तारापूर गावचे माजी सरपंच तसेच सहकार शिरोमणी साखर कारखाना चे संचालक प्रदीप दादा निर्मळ, माजी सरपंच शिंदे, संस्थापक सागर निर्मळ सर, ग्रामपंचायत सदस्य हरी भुई, पांडुरंग शिंदे, सज्जन नाना भोसले, प्रदीप जी कदम, सागर देवकर, सिताराम रंणदवे सर, अमोल रंणदिवे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अक्षय भुई यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, युवकांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून समाजसेवेचा आदर्श निर्माण करावा, असे मत व्यक्त केले. रक्तदानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते, त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन हे काळाची गरज असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, तपासणी व्यवस्था आणि अल्पोपहाराची योग्य सोय करण्यात आली होती. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.
अक्षय हरी भुई यांनी सर्व रक्तदाते, मान्यवर आणि आयोजकांचे आभार मानत, भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

वाढदिवस साजरा करण्याचा हा समाजहिताचा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
@संविधान न्यूज चैनल
रक्तदान हे एक सामाजिक बांधिलकी
