पंढरपूर तालुक्याचा राज्यस्तरीय सन्मान ,आरोग्य विभाग

🌹 पंढरपूर तालुक्याचा राज्यस्तरीय सन्मान 🌹

“भक्ती विठोबाची – सेवा आरोग्याची” उपक्रमांतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार प्रदान

मुख्य संपादक : राम गायकवाड

पंढरपूर : आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भक्ती विठोबाची – सेवा आरोग्याची” या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार यंदा पंढरपूर तालुक्यास प्राप्त झाला आहे. मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे व डॉ. महेश सुडके यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक व अन्य वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आषाढी वारीत आरोग्य सेवेचा प्रभावी उपक्रम

“भक्ती विठोबाची – सेवा आरोग्याची” हा उपक्रम दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान राबविला जातो. देहू–आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर लाखो वारकऱ्यांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना करण्यात येतात.

या उपक्रमांतर्गत —

मार्गावर विनामूल्य आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जातात.

आवश्यक औषधोपचार व आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

आरोग्य दूतांची नियुक्ती करून “जे पाऊले चालती पंढरीची वाट, आरोग्य दूत देईल आरोग्यास साथ” या उक्तीप्रमाणे सेवा दिली जाते.

वारीदरम्यान होणाऱ्या आजारांचे तात्काळ निदान व मोफत औषधोपचार केले जातात.

स्वच्छता, संसर्गजन्य आजार प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जातात.

या सर्व कामगिरीची दखल घेत पंढरपूर तालुक्यास राज्यस्तरीय उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

तालुक्याचा सन्मान, आरोग्य विभागात उत्साह

या पुरस्कारामुळे पंढरपूर तालुक्याची राज्यपातळीवर मान उंचावली असून, आरोग्य विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि संवेदनशील कार्याची ही दखल असल्याची भावना व्यक्त होत आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे “सेवा हीच खरी भक्ती” हा संदेश अधिक दृढ झाला आहे.

 

@संविधानन्यूजRG

Sanvidhannews.com

#महाराष्ट्र राज्य

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *