✍️ बोपळे येथील दरोडा प्रकरणाचा धक्कादायक उलगडा : शेतमालकिणीनेच रचला बनाव; मोहोळ पोलिसांचा तपासात पर्दाफाश
सोलापूर ,प्रतिनिधी :- दादासाहेब जगतापसंविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
तालुक्यातील बोपळे येथे घडल्याचे सांगितल्या गेलेल्या दरोडा आणि मारहाण प्रकरणाचा मोहोळ पोलिसांनी सखोल तपास करत धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात शेतमालकिणीनेच स्वतःच्या घरावर दरोडा पडल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले असून, शेतातील सालगडी कामगार काम सोडून जाऊ नयेत या उद्देशाने हा प्रकार रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
मोहोळ तालुक्यातील बोपळे येथील रहिवासी संध्या विलास देहे यांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरी दरोडा पडल्याची फिर्याद मोहोळ पोलीस ठाण्यात दिली होती. फिर्यादीनुसार, त्यांचे पती गावाबाहेर गेलेले असताना त्यांच्या शेतात काम करणारे सालगडी शिवदास यशवंत मडावी व त्यांची पत्नी रंजना मडावी (रा. चिरांदेवी, जि. चंद्रपूर) यांनी घरात घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवला, हातपाय बांधले व मारहाण केली. तसेच कपाटातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले, अशी गंभीर तक्रार करण्यात आली होती.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. संशयित सालगडी दांपत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिरांदेवी येथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले व पुढील चौकशीसाठी मोहोळ येथे आणले.
मात्र चौकशीदरम्यान फिर्यादी महिलेच्या कथनात आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठी विसंगती आढळून आली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या प्रकरणातील सत्य हळूहळू समोर आले. अखेर पोलिसांच्या कसून चौकशीसमोर फिर्यादी महिलेनेच दरोड्याचा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचे कबूल केले.
तपासात उघड झाले की, शेतातील सालगडी कामगार काम सोडून जाऊ नयेत आणि ते शेतावरच राहावेत या भीतीपोटी संबंधित महिलेने दरोडा आणि मारहाणीची खोटी तक्रार दिली होती. प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या खोट्या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ वाया गेल्याने आता संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली. तसेच नागरिकांनी कोणतीही खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या घटनेमुळे बोपळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, खोट्या तक्रारीमुळे निरपराध व्यक्तींवर संशयाची छाया पडू शकते, याची जाणीव ठेवून नागरिकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
