विश्वमंगल डेव्हलपमेंट बिझनेस फोरम पंढरपूरची स्थापना.

*विश्वमंगल मराठी फाउंडेशन आयोजित संवाद बैठक पंढरपूर येथे उत्साहात संपन्न*

 

*विश्वमंगल डेव्हलपमेंट बिझनेस फोरम पंढरपूरची स्थापना….*

 

पंढरपूर ,प्रतिनिधी : आयोजित संवाद बैठक पंढरपूर येथे उत्साहात संपन्न झाली. मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण, उद्योग व सामाजिक विकास या विविध विषयांवर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

 

बैठकीच्या प्रस्ताविकात फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. मराठी भाषिक व्यावसायिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन-संवर्धन करणे आणि “लोकमंगल ते विश्वमंगल” हा प्रवास कशा पद्धतीने घडला याविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच आ.सुभाष बापू देशमुख यांच्या सामाजिक कार्याची मांडणी यावेळी केली.

 

१६ देशांमध्ये वास्तव व विविध क्षेत्रातील अनुभव असलेले सुरेश देशमुख यांनी फाउंडेशनच्या संघटनात्मक रचनेबाबत माहिती दिली. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर समित्या गठीत करून विश्वमंगलची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी भूषण कुलकर्णी यांनी विश्वमंगल बिझनेस नेटवर्क अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या “विश्वमंगल बिझनेस डेव्हलपमेंट फोरम” विषयी माहिती दिली. ग्रामीण भागातील उद्योजक, व्यापारी व व्यवसायिकांना एकत्र आणून परस्पर सहकार्य, उद्योगवाढ, मार्केटिंग, चर्चासत्रे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीसाठी काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत” हे ध्येय समोर ठेवून फोरम कार्य करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पंढरपूरमध्ये या फोरमची पहिली शाखा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

अजित कंडरे येलमार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सुधारणा उपक्रमाविषयी माहिती दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, लोकसहभाग आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून शाळा सक्षम करण्यासाठी “विश्वमंगल ज्ञानमंदिर सुधारणा कार्यक्रम” राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील १००० शाळांच्या सुधारणेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

गणेश पाटील यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. भंडीशेगाव येथे ४२ एकर परिसरात २० हजार झाडांची लागवड, चिंचणी येथील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, सरकोली पर्यटन केंद्र, भालेवाडी एकात्मिक पर्यटन केंद्र अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला. राज्य, देश आणि विदेश स्तरावर कार्य विस्तारासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बापू देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पांडुरंगाच्या आशीर्वादाने १ मे रोजी आळंदी येथे विश्वमंगलची स्थापना करण्यात आली. सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गाव, जिल्हा व राज्य विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकोली, चिंचणी, भालेवाडी, भेंड, भंडीशेगाव, चिनके आणि वाडीकुरोली यांसारखी गावे जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठी व्यवसाय, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

 

यावेळी प्रत्येकाने आपल्या जिल्हा परिषद शाळेचे पालकत्व स्वीकारून शाळा सुधारणा मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. विदेशात कार्यरत असलेल्या मराठी बांधवांना गाव विकासासाठी जोडण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

विशेष म्हणजे, पंढरपूर बिझनेस डेव्हलपमेंट फोरमची अधिकृत स्थापना यावेळी करण्यात आली. विविध क्षेत्रातील ४० व्यावसायिकांचा फोरम तयार करण्यात आला असून, VMBN अप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व व्यवसायिकांना एकत्र जोडले जाणार आहे. व्यवसाय वाढ, परस्पर सहकार्य, मार्केटिंग नियोजन, देवाणघेवाण आणि साप्ताहिक बैठकींच्या माध्यमातून नेटवर्क अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भूषण कुलकर्णी सुरेश देशमुख, अजित कंडरे, अनंता चव्हाण, मोहन अनपट, समाधान काळे, शशिकांत कराळे, विलास भोसले, श्रीकांत दवले, संतोष दळवी, सुभाष खटावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती होते, यावेळी सूत्रसंचालन भीमाशंकर कुंभार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!