भिशीच्या माध्यमातून २ कोटी ६९ लाखांची फसवणूक; आर्थिक गुन्हे

 

सोलापूर प्रतिनिधी,दि. १४ ऑक्टोबर २०२५ : सोलापूर शहरातील आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ₹२ कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दांम्पत्याला आंध्रप्रदेश राज्यातून अटक केली आहे.

फिर्यादी शिवाजी लक्ष्मण आवार (रा. साईबाबा चौक, सोलापूर) व इतर ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, श्री ओम साई फायनान्स या नावाने भिशी चालवणारे रमेश अंबादास चिप्पा व त्यांची पत्नी सुजाता रमेश चिप्पा (रा. खुशी रेसिडेन्सी, गीतानगर, सोलापूर) यांनी ठेवीदारांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली.

दोघांनी दि. ०१ नोव्हेंबर २०२० ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत जास्त व्याजाचे आमिष दाखवून १३१ ठेवीदारांकडून ₹२,६९,१९,०००/- रुपये स्वीकारले, मात्र ठेव रक्कम किंवा व्याजाचा परतावा न करता दोघे फरार झाले.

या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३३४/२०२४ भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३४ तसेच एम.पी.आय.डी. कायद्यान्वये दि. ५ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पळून गेले होते. तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी दांम्पत्य हे लक्खावरम, मल्लिकीपुरम मंडल (राज्य आंध्रप्रदेश) येथे लपून राहत असल्याचे निष्पन्न केले.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पथकास राज्याबाहेर जाण्याची परवानगी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आंध्रप्रदेश पोलिसांच्या मदतीने दोघांना दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली.

 

त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर ट्रांझिट वॉरंट घेऊन सोलापूर येथे आणण्यात आले. दि. १३ ऑक्टोबर रोजी आरोपींना मा. श्री. राणे, विशेष न्यायाधीश, एम.पी.आय.डी. कोर्ट, सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांना दि. १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई उप पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील (गुन्हे/विशा), सहा. पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या पथकाने केली.

या पथकात स.फो. अंबादास चव्हाण, पो.ह. पिंटू जाधव, महिला पो.ह. रेश्मा वाकडे, पो.शि. तौसिफखान पठाण, महिला पो.शि. रुपाली काकरे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पो.ह. मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *