सोलापूर ,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह.संपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील इनोव्हेटिव्ह स्कूलमध्ये मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच मुलांनी अनेक पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवावे आणि माणूस म्हणून समृद्ध व्हावे, यासाठी मोहोळ तालुक्यातील इनोव्हेटिव्ह स्कूलमध्ये ‘वाचनबेल’ हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमात आठवड्यातील चार दिवस रोज एक तास मुलांना वाचनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वाचनबेल सुरू झाल्यावर शाळेच्या वेळेत मुलांनी वाचनालयातील पुस्तके घेऊन वाचन करणे, वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय लिहिणे, तसेच पुस्तक वाचनाचा तास पूर्ण न झाल्यास घरी नेऊन वाचणे, हे कार्य करायचे आहे. तसेच, पुस्तक लेखकांना पुस्तकाबद्दल आपले मत पत्राद्वारे कळविणे देखील या उपक्रमाचा भाग आहे.
शाळेचे मुख्याध्यापक रियाज तांबोळी यांनी या उपक्रमाबद्दल सांगितले की, “यातून चांगले वाचक आणि लेखक तयार होतील तसेच मुलांची शब्दसंपदा वाढेल.”
या उपक्रमाचा शुभारंभ मार्च २०२५ मध्ये साहित्यिक संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी सकाळ एनआयई वर्तमानपत्र, युनिक फीचर्सचे पासवर्ड त्रैमासिक, किशोर मासिक यांच्याकडून मदत मिळत आहे. तसेच सोलापूरचे प्रिसिजन फाऊंडेशन, पुण्याचे समकालीन प्रकाशन, मुंबईचे गिल्लो फाऊंडेशन, नाशिकची आनंद निकेतन शाळा, लोकमंगल फाऊंडेशन यांनी वाचनासाठी पुस्तके पुरवली आहेत.
उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी रियाज तांबोळी, आनंद माने, सुजाता गोडसे, ज्योती माळी, किरण भंडारे, कांचन वाघमोडे, पूजा बसाटे, पल्लवी पुजारी, शुभांगी माने, रोहिणी बसाटे, भक्ती सुतार हे टीम मेहनत करत आहेत.
