अंकोलीचा पैलवान रोहन पवार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र **सोलापूर जिल्ह्याचा अभिमान!

 

 

सोलापूर/ प्रतिनिधी :– दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह.संपादक.

मोहोळ तालुक्यातील अंकोली या छोट्याशा गावातील आण्णासाहेब नारायण पवार यांचे चिरंजीव यांनी उदयोन्मुख कुस्तीपटू पै. रोहन पवार याने आपल्या चिकाटी, मेहनत आणि दमदार खेळाच्या जोरावर राष्ट्रीय (नॅशनल) कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

नळदुर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत रोहनने जबरदस्त कामगिरी करून प्रतिस्पर्ध्यांना नमवले. त्याच्या या प्रभावी प्रदर्शनाच्या जोरावर त्याची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल रोहनचे प्रशिक्षक, पालक, सहकारी खेळाडू आणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले असून, “रोहन भविष्यात महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

रोहनने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना, प्रशिक्षकांना व मित्रपरिवाराला दिले असून, “हे यश माझ्या गावाचे आणि सोलापूर जिल्ह्याचे आहे,” अशी भावना त्याने व्यक्त केली.

 

दरम्यान, मोहोळ तालुक्यातील सोहळे गावात ग्रामस्थांच्या वतीने रोहन पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी परमेश्वर कडलक, तानाजी सोनवणे, सचिव सोनवणे, पप्पू रणगुळे, विकास डोळारे, ऋषिकेश नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रोहनच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अंकोली गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. खेळ क्षेत्रात गावातील तरुणांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *