माढा,प्रतिनिधी :-शरद भांगे,दीपावलीच्या शुभमुहूर्तावर माढा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे इरूयाम फाऊंडेशन – हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी तर्फे स्वच्छता मोहीम, ऐतिहासिक व्याख्यान आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवार, दि. २० ऑक्टोबर रोजी आयोजित या उपक्रमाला माढा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात किल्ला परिसरात स्वच्छता मोहिमेने झाली. त्यानंतर दिव्यांच्या प्रकाशात किल्ल्याचे सौंदर्य खुलून दिसले. दीपोत्सवाच्या निमित्ताने इतिहास संशोधक प्रा. मयूर चव्हाण यांनी ऐतिहासिक विषयावर माहितीपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, त्यातील वास्तुशिल्प आणि सांस्कृतिक वारसा याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी दिनेश जगदाळे, शरददादा भांगे, किरण चव्हाण, ऍड. विजयकुमार अडकर, डॉ. राजकुमार आडकर, बाळासाहेब वागज, शेखर सुर्वे, रमेश शिरसाठ, अजय गायकवाड, विजय ठोंबरे, अजय शहा, भैय्या खरात, बाळकृष्ण गायकवाड, रानबा कदम, अर्जुन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शंकर नागणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश नांगरे यांनी मानले. या उपक्रमामुळे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, तरुण पिढीत वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.
