सोलापूर,प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.,सोलापूर :- सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास इंचागांव टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात नवोदय विद्यालय कतलगी (गुलबर्गा) येथील शिक्षक महेश पांडुरंग पोफळे (वय ३२, रा. अंकोली, ता. मोहोळ) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचे मित्र अतुल दिनकर डोके (वय ३०, रा. अंकोली, ता. मोहोळ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दोघे मित्र दुचाकी (क्रमांक MH-13/KS-6883) वरून बेगमपूरकडे जात असताना, इंचागाव शिवारातील टोलनाक्याजवळ समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने (क्रमांक MH-09/FL-1126) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत महेश पोफळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अतुल डोके गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महेश पोफळे हे केवळ चार महिन्यांपूर्वीच नवोदय विद्यालय, कतलगी (गुलबर्गा) येथे शिक्षक म्हणून रुजू झाले होते. दिवाळी सुट्टीसाठी ते मूळ गावी आले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे.

या अपघातामुळे अंकोली व परिसरात शोककळा पसरली असून, शिक्षक समाज, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सणाचा आनंद विरून गेला आहे. गावकऱ्यांनी महेश पोफळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
