सोलापूर,प्रतिनिधी : दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.
सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिध्द गोपाळपूर ता. पंढरपूर| दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथील गंगावेश मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक म्हशी पळविण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पारंपरिक लोकउत्सवाला आमदार समाधान आवताडे यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सणाचा आनंद सर्वांसोबत वाटला.
“म्हशी पळविण्याचा उत्सव हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून शेती, पशुधन आणि बळीराजाच्या श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे,”
असे आमदार आवताडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमादरम्यान तरुणांनी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या म्हशींसह स्पर्धेत भाग घेतला. मैदान परिसरात आनंद, जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आमदार आवताडे यांनी पुढे बोलताना शेती आणि पशुपालन क्षेत्रात अधिक प्रगती होऊन बळीराजाचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.
ग्रामस्थांनी या परंपरेचे सातत्य राखत ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले आणि गोपाळपूर ग्रामस्थांच्या उत्कृष्ट आयोजनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
