राज्यस्तरीय ‘प्रबुद्ध दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित नजीकपिंपरीचे सुपुत्र आनंदकुमार सरवदे
सोलापूर ,प्रतिनिधी :– दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे नजीकपिंपरी येथील सुपुत्र, सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक तथा अभिनेते आनंदकुमार सरवदे यांना “प्रबुद्ध दिग्दर्शक” हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून, त्यांच्या कार्याचा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र गौरव होत आहे.
दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे सत्यशोधक महात्मा फुले फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या भव्य कार्यक्रमामध्ये आनंदकुमार सरवदे यांचा विशेष सन्मान होणार आहे.
आनंदकुमार सरवदे हे मूळचे नजीकपिंपरी येथील रहिवासी असून, गेल्या २५ वर्षांपासून ते सिनेमा क्षेत्रात कार्यरत आहेत. तालुक्यातील अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी चित्रपट क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपट निर्मितीमध्ये बुद्ध, फुले, शिव, शाहू या प्रबुद्ध विचारसरणीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या लघुपटांमधून समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण काम सातत्याने केले जाते.
त्यांच्या “राम अकबर कांबळे” या चित्रपटाला अलीकडेच गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याने त्यांची राष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक भक्कम झाली आहे.
त्यापूर्वी ते “तुरुंग देश” (मराठी) आणि “पैगाम” (हिंदी) या चित्रपटांत प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.
अगामी “बांझ” या हिंदी चित्रपटात ते मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात येईल, अशी अपेक्षा आहे.
ग्रामीण भागातून पुढे येऊन आपल्या कष्ट, जिद्द आणि प्रतिभेच्या जोरावर सिनेमा क्षेत्रात मानाची जागा निर्माण केलेल्या आनंदकुमार सरवदे यांच्या सन्मानाबाबत अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. कीर्तिपालजी गायकवाड यांनी सांगितले की, “हा आमच्या संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
या कार्यक्रमासाठी भारतीय प्रबुद्ध चित्रपट चळवळीचे जनक, चित्रपट निर्माते व अभिनेते भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर शाखेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, हा भव्य सन्मान सोहळा अधिक भव्य करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे.
