अनुसूचित जातीच्या आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप?
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत ‘हिंदू बेडा जंगम’ जात दाखल्यावर गंभीर तक्रार दाखल……
मुख्य संपादक :- राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल
मोहोळ नगर परिषदेच्या सन २०२५ मध्ये पार पडलेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर निवडून आलेल्या उमेदवाराविरोधात बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग (जात प्रमाणपत्र देणे व पडताळणी) अधिनियम २००० मधील कलम ६ तसेच अधिनियम २००३ मधील कलम ७ अन्वये जात पडताळणी समितीकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार हे हिंदू-खाटीक समाजाचे असून अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. तक्रारदारांच्या सख्ख्या भावाची पत्नी या सदर निवडणुकीतील पराभूत उमेदवार असून तक्रारदार यांनी अधिकृत निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार आपल्याला असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित निवडून आलेल्या नगराध्यक्ष उमेदवाराने स्वतःला हिंदू बेडा जंगम या अनुसूचित जातीचा दाखला सादर करून निवडणूक लढवली. मात्र प्रत्यक्षात सदर उमेदवार व त्यांचे कुटुंब हिंदू जंगम समाजाचे असल्याचा ठाम दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, उमेदवाराच्या आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे (जन्म १९२८) यांच्या शालेय नोंदीमध्ये स्पष्टपणे हिंदू जंगम अशी जात नोंद आहे. संविधानपूर्व काळातील हा सर्वात जुना व महत्वाचा दस्तऐवज असल्याने, त्याच्या आधारे पुढील पिढ्यांमध्ये बेडा जंगम अशी नोंद होणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे व संशयास्पद असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय, उमेदवाराच्या वडिलांचा १९७८ सालातील विना क्रमांकाचा जात दाखला तसेच १९६९ सालातील शालेय दाखला सादर करण्यात आला असून, त्यामागे कोणताही ठोस पुरावा अथवा अधिकृत चौकशी झाल्याचे आढळून येत नसल्याचा आरोप आहे.
तसेच, उमेदवाराने आपल्या चुलत्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा आधार घेत स्वतःच्या वैधतेसाठी अर्ज सादर केल्याचे समोर आले आहे. मात्र संबंधित चुलत्यांना अत्यंत कमी कालावधीत, दक्षता पथकाची चौकशी न होता जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रारीत आणखी नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कुटुंब हे विरभद्रेश्वराचे मानकरी पुजारी असून लिंगायत-जंगम परंपरेशी त्यांचा निकटचा संबंध आहे. बेडा जंगम समाजाची पारंपरिक सामाजिक व धार्मिक भूमिका वेगळी असून, सदर कुटुंब त्या समाजाशी संबंधित नसल्याचे ठामपणे सांगण्यात आले आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता, संबंधित नगराध्यक्ष उमेदवार हे हिंदू जंगम समाजाचे असून हिंदू बेडा जंगम या अनुसूचित जातीचा दाखला चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सदर जात प्रमाणपत्र व त्याआधारे मिळवलेली निवडणूक वैधता रद्द करावी, अशी मागणी जात पडताळणी समितीकडे करण्यात आली आहे.
