मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात शोककळा
अजित ‘दादा’ पवार यांना ग्रामस्थांची भावपूर्ण श्रद्धांजली**
सोलापूर| प्रतिनिधी : दादासाहेब जगताप
(संविधान न्यूज चॅनल – सहसंपादक)
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली गावात अजित ‘दादा’ पवार यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने समाजकारण, राजकारण तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली असून ग्रामस्थांच्या भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण झाले आहे.
अंकोली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत अजित ‘दादा’ पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, मेणबत्त्या प्रज्वलित केल्या व दोन मिनिटांचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजली कार्यक्रमास उपसरपंच अजिंक्य क्षीरसागर, शहाजी जगताप,
ग्रामपंचायत सदस्य नेताजी (आबा) पवार, भैय्या विलास पवार, महाई-सेवा प्रा. गणेश पवार, पिनू गुरव, रणजित पवार, सुधाकर गायकवाड यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजित ‘दादा’ पवार यांच्या सामाजिक, राजकीय व लोकहितकारी कार्याचा गौरव केला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला असून समाजातील प्रत्येक घटकासाठी ते नेहमीच मार्गदर्शक ठरले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
श्रद्धांजली सभेमुळे संपूर्ण अंकोली गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. “अजित दादा अमर रहें” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी त्यांना
अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. अजित ‘दादा’ पवार यांच्या स्मृती सदैव जनमानसात जिवंत राहतील, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
@संविधान न्यूज चैनल व पोर्टल
