कोन्हेरीची ऐश्वर्या चव्हाणची दमदार कामगिरी – दयानंद विद्यालयात शास्त्र शाखेत द्वितीय क्रमांक, ८०% गुणांसह उज्ज्वल यश
अंकोली प्रतिनिधी – दादासाहेब जगताप,(संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक)
मोहोळ तालुक्यातील मौजे कोन्हेरी या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या गावाचा आणि कुटुंबाचा मान उंचावला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत ऐश्वर्या बालाजी चव्हाण हिने सोलापूर येथील दयानंद विद्यालयाच्या शास्त्र शाखेत ८० टक्के गुण मिळवत महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
शेतकरी कुटुंबातील ऐश्वर्या ही वडील बालाजी चव्हाण व आई वर्षा चव्हाण यांची कन्या असून, अत्यंत साध्या परिस्थितीतून तिने हे यश संपादन केले आहे. कोन्हेरीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना तिने चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण कोन्हेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण शारदा विद्या मंदिर, कोन्हेरी येथे पूर्ण केले. सध्या ती सोलापूर येथील दयानंद शास्त्र महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, यंदा शास्त्र शाखेचा एकूण निकाल ८८.५२ टक्के लागला असून त्यात ऐश्वर्याने द्वितीय क्रमांक मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
या यशाबद्दल कोन्हेरी व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐश्वर्याचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. यामध्ये कोन्हेरी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका पद्मावती डुबल, शिक्षिका सुनिता पुळजे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वर्षा मगर, छाया शेळके, अजिंक्य शेळके, तसेच संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेश चोप्रा यांचा समावेश आहे.
तसेच दयानंद महाविद्यालयाचे प्रशासक प्रा. डॉ. विजयकुमार उबाळे, प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, उपप्राचार्या एस. एम. जगताप, पर्यवेक्षक एस. जी. मादळे, कलाशाखेचे समन्वयक व्ही. एस. बनसोडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही ऐश्वर्याचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून, कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
