विद्यार्थिनींनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शाळेचा नावलौकिक राज्यभर उंचावला.

💥कल्याण येथे राज्यस्तरीय गतका स्पर्धेत सेवासदन प्रशालेच्या विद्यार्थिनींचा सुवर्ण वर्षाव; विविध प्रकारांत दमदार यश…

✍️ अंकोली ,प्रतिनिधी :– दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.

दिनांक ३ मे २०२६ रोजी कल्याण, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय गतका क्रीडा स्पर्धेत सु. रा. मुलींच्या सेवासदन प्रशालेच्या विद्यार्थिनींनी भरीव यश संपादन करत सुवर्णपदकांची लयलूट केली. विविध वयोगट आणि प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्य, शिस्तबद्ध सादरीकरण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ यामुळे या विद्यार्थिनींनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शाळेचा नावलौकिक राज्यभर उंचावला.

१७ वर्षांखालील मुलींच्या फरीसोटी वैयक्तिक प्रकारात कु. गिरीजा भोसले हिने अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशामुळे सेवासदन प्रशालेसाठी स्पर्धेची दमदार सुरुवात झाली. त्याच गटातील फरीसोटी सांघिक प्रकारात गिरीजा भोसले, श्रेया पाटील, तृप्ती अलदर व वैष्णवी डोळे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट समन्वय आणि आक्रमक खेळ सादर करत पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

याच वयोगटातील सिंगल सोटी वैयक्तिक प्रकारात कु. अक्षरा जाधव हिनेही तितक्याच आत्मविश्वासाने खेळ करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीने संघाच्या यशात भर पडली. सिंगल सोटी संगीत प्रकारात कीर्ती शिंदे, ज्ञानेश्वरी मोरे, आर्या कोळसे व वैष्णवी स्वामी या विद्यार्थिनींनी तालबद्ध आणि आकर्षक सादरीकरणातून परीक्षकांची मने जिंकत सुवर्णपदक मिळवले.

या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे यांचे मार्गदर्शन लाभले असून स्वाती मॅगेरी व शिल्पा चन्ना यांनीही सातत्यपूर्ण प्रशिक्षण देत विद्यार्थिनींच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मेहनतीमुळेच विद्यार्थिनींना राज्यस्तरीय स्पर्धेत हे भव्य यश मिळवता आले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, उपाध्यक्ष राजीव प्रधान, शालेय समिती अध्यक्षा विद्या लिमये, सचिवा विना पत्की तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले. मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार यांनीही खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालक व शिक्षकवृंदांनीही विद्यार्थिनींच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.

सेवासदन प्रशालेने क्रीडा क्षेत्रात सातत्याने केलेली प्रगती आणि विद्यार्थिनींची मेहनत यामुळे शाळेचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक दृढ झाला आहे. या यशामुळे भविष्यातील स्पर्धांसाठी विद्यार्थिनींना अधिक प्रेरणा मिळणार असून राज्यस्तरावर शाळेची ओळख अधिक बळकट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!