अंकोली परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेचा ‘गुलाबपुष्प’ देऊन उत्साहात प्रारंभ; ३१० विद्यार्थ्यांनी घेतली ‘कॉपीमुक्ती’ची शपथ
सोलापूर (ता. मोहोळ) | प्रतिनिधी : दादासाहेब जगताप
(संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे असलेल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे उत्साहात, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात स्वागत करण्यात आले.
या परीक्षा केंद्रावरून एकूण ३१० विद्यार्थी परीक्षा देत असून, परीक्षेचा ताण कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी यावेळी ‘भयमुक्त आणि कॉपीमुक्त’ वातावरणात परीक्षा देण्याची सामूहिक शपथ घेतली.
मनोबल वाढवण्यासाठी मान्यवर उपस्थित
या प्रेरणादायी उपक्रमावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी
भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य किशोर जाधव,
बेगमपूर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कल्याण भोसले,
कुरुल न्यू इंग्लिश कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब देशमुख,
केंद्र सहसंचालक औदूंबर बड्डे,
तसेच केंद्र संचालक महेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना केंद्र संचालक महेश पाटील यांनी सांगितले की,
“प्रशासनातर्फे परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे केंद्र आदर्श ठरेल, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन बसाप्पा पुजारी यांनी केले. तसेच केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मकता स्पष्टपणे दिसून आली.
