मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीचे मोठे यश,

सारथी संस्थेच्या मार्गदर्शनातून यूपीएससीमध्ये १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीचे मोठे यश – विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव….

सोलापूर प्रतिनिधी:- दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक .

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या मार्गदर्शनातून यावर्षी UPSC Civil Services Examination २०२५ च्या अंतिम निकालामध्ये तब्बल १२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या निकालामुळे राज्यभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मराठा समाजासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

सारथी संस्थेच्या मार्गदर्शन, प्रशिक्षण व अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत असून अनेक युवक-युवती प्रशासन सेवेत प्रवेश करण्याचे स्वप्न साकार करत आहेत. या वर्षी जाहीर झालेल्या निकालामध्ये कार्तिक रविंद्र बच्छाव (Rank 177), हर्षवर्धन हरीश पाटील (Rank 349), कुणाल संजय अहिरराव (Rank 430), श्रुती संतोष चव्हाण (Rank 527), धनंजय संजय दिघे (Rank 529), अविष्कार विजय डेर्ली (Rank 591), अभिषेक अशोक टेकाडे (Rank 610), अभिनी अरुण काळेकर (Rank 675), अलेश्वर भाऊसाहेब ठवळे (Rank 687), सुरज माणिकराव सूर्यवंशी (Rank 702), रामेश्वर महादेव शिंदे (Rank 705) आणि राजश्री शांताराम देशमुख (Rank 754) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित नसून सामाजिक चळवळीचेही मोठे यश मानले जात आहे. महाराष्ट्रात झालेल्या मराठा क्रांती मोर्चा या ऐतिहासिक चळवळीमधून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची मागणी जोरदारपणे पुढे आली होती. त्याच मागणीच्या पार्श्वभूमीवर सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण व विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे.

सारथी संस्था UPSC Civil Services Examination तसेच Maharashtra Public Service Commission (एमपीएससी) सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, अभ्यास साहित्य, निवास व्यवस्था आणि विविध शैक्षणिक सुविधा पुरवते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून त्यांचे प्रशासन सेवेत जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागले आहे.

यंदा यूपीएससीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सारथी संस्थेतील अधिकारी-कर्मचारी, प्रशिक्षक तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीत सक्रियपणे काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त होत आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच मराठा व कुणबी समाजातील अनेक युवक-युवती देशाच्या प्रशासन व्यवस्थेत अधिकारी म्हणून कार्यरत होत असल्याचे दिसून येत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल राज्यभरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही अधिकाधिक युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासन सेवेत प्रवेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिक्षण, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *