इंदापूर,प्रतिनिधी:-विठ्ठल काळे. इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात सापडलेल्याअनोळखी महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित महिला कटफळ, ता. बारामती येथील दिपाली सुदर्शन जाधव (वय 30) असल्याचे तपासात समोर आले असून तिचाच पती सुदर्शन ऊर्फ रविराज रणजीत जाधव (वय 36) याने विवाहबाह्य संशयातून पत्नीचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक गुन्हा उघड झाला आहे.
दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी मदनवाडी गावच्या हद्दीत भिगवण-बारामती रोडलगत ओढ्याच्या पुलाखाली ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेला कुजलेला मृतदेह आढळला होता. मृतदेहावर ‘Raviraj’ असे हातावर कोरलेले गोंदण तपासातील महत्वाचा धागा ठरले. गोपनीय माहिती आणि आधुनिक तपास पद्धतींच्या साह्याने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तो दिपाली जाधव हिचाच असल्याचे निश्चित केले.
दरम्यान, आरोपी पतीने १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बारामती पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तथापि, चौकशीत त्याच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. शेवटी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी कटफळ येथील घरी पती-पत्नीमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने लोखंडी वस्तूने पत्नीच्या डोक्यात जोरदार प्रहार करून तिचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून ज्युपिटर दुचाकीवरून नेऊन मदनवाडी येथील पुलाखाली फेकून दिला.
गुन्ह्याच्या उघडकीनंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या तपासात विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि भिगवण पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई केली. या पथकात पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, सपोनि कुलदीप संकपाळ यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
