किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे,

वर्षा निवासस्थान, मुंबई
प्रतिनिधी बालाजी शिंदे:शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणा (गुड गव्हर्नन्स री इंजीनियरिंग) बाबत सादरीकरणाप्रसंगी दिले. दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याचे निर्देशही दिले. नागरिक केंद्रित, जबाबदार आणि सुशासनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा करण्यात येत असून या सुधारणांमध्ये प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग नोंदवित आपला ठसा उमटवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

#प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे. प्रत्येक विभागाने रिक्त पदांच्या संख्येनुसार आपले मागणी पत्र द्यावे, तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेत, त्यांची क्षमता वृद्धी करावी. तसेच नागरिकांना सर्व सेवा विनाविलंब, सहजपणे उपलब्ध होण्यासाठी #आपलेसरकार २.० पोर्टल कार्यान्वित करण्यात यावे. राज्यात असलेले आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र यांचे सक्षमीकरण करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सुचित केले.

बैठकीत अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा आणि समग्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल यांनी सादरीकरण केले. बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (प्रशासकीय सुधारणा) राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंह चहल, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *