सोलापूर , पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे मच्छी मार्केट उभारण्याचा निर्धार व्यक्त केला, मा.समाधान जगताप

 

 

सोलापूर ,प्रतिनिधी :- पंढरपूर तालुक्यातील मौजे तारापूर येथील गेल्या पंधरा वर्षांपासून भोई समाज मच्छी विक्रीसाठी स्वतंत्र जागेची मागणी करीत होता. अखेर तारापूर ग्रामपंचायतचे सरपंच सौ. भारतीताई समाधान जगताप यांच्या सक्रिय पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. तारापूर गावातील माननीय समाधान जगताप यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे मच्छी मार्केट उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

 

या मच्छी मार्केटमुळे तारापूरसह फुलचिंचोली, खरसुळी, विटे, पोहोरगाव, सुस्ते, मगरवाडी आदी परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. सध्या या गावांतून अनेक नागरिक तारापूर येथे येऊन मासे विक्रीसाठी व खरेदीसाठी प्रवास करीत असतात. नव्या सुविधायुक्त मच्छी मार्केटमुळे त्यांना सुरक्षित, स्वच्छ व व्यवस्थित व्यापार केंद्र उपलब्ध होणार आहे.

 

 

समाधान जगताप यांनी या बाजारपेठेला आधुनिक स्वरूप देण्याचे नियोजन केले असल्याचे समजते. स्वच्छतेची योग्य व्यवस्था, पाणी व विजेची सोय, वाहतूक सुलभता, तसेच मासेमारी व्यवसायात रुची असलेल्या उद्योजकांसाठी संधी निर्माण करण्याचा उद्देश ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणार आहे.

 

 

 

 

भोई समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला आता न्याय मिळत असून लवकरच या प्रकल्पाचा शुभारंभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *